वडगाव जलशुध्दीकरणाकडून आठवड्यात दोन दिवस पुरवठा बंद
सिंहगड रस्ता – शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे सिंहगड रस्त्याच्या उशाला असली तरी या भागाला ऐन दिवाळीत पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणात मागील वर्षांपेक्षा अधिक पाणी असले तरी, पाणी नियोजनासाठी वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून प्रत्येक आठवड्यात एक दिवस या भागात पाणीकपात केली जात आहे. त्यामुळे, निदान दिवाळी तरी ही कपात रद्द करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेकडून वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून दरदिवशी सुमारे 125 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यात सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, आंबेगाव, कोंढव्याचा काही भाग, बिबवेवाडीचा काही भागाचा समावेश आहे. मात्र, या सर्वच भागात एकाच दिवशी पुरेसे पाणी देणे शक्य नसल्याचे सांगत प्रशासनाकडून या जलकेंद्रा अंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याचे सात दिवसानुसार, विभाजन केले असून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. तर मुख्य खात्याकडूनही प्रत्येक गुरूवारी पाणी बंद ठेवले जाते.
यामुळे गेल्या वर्षभरात सिंहगड रस्ता भागात आठवड्यात दोन वेळा पाणी बंद असल्याचे चित्र असते. दिवाळीपूर्वीच्या काही दिवस आधी गुरूवार आणि सोमवारी पाणी बंद ठेवण्यात आल्याने दिवाळीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असून कपात करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या भागात पुन्हा पाणी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पाणी पुरवठ्याबाबत दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून अधिकाऱ्यांकडून दि. 1 जानेवारीपासून ही कपात रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रशासनाकडून दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पाणी नियोजनासाठी ही कपात केली होती. मात्र, पुढे ती रद्द करण्याबाबत निर्णय न घेता, तोच नियम ठेवून प्रशासन नागरिकांची फसवणूक करत आहे.
– मंजूषा नागपूरे, नगरसेविका