बीजिंग – अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे अभिनंदन करण्यास चीनने नकार दिला आहे. या निवडणुकीचे अधिकृत निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत, असे कारण देत चीनने बायडेन यांचे अभिनंदन करण्यास नकार दिला आहे.
मेक्सिको आणि रशिया यांनीही बायडेन यांच्या निवडीविषयी सावध भूमिका घेत अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची लढत आता कोर्टात होणार आहे त्यामुळे तेथील निकालावरही बरेच काहीं अवलंबून असणार आहे असे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे.
या संबंधात बोलताना चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबिन यांनी म्हटले आहे की, आम्हाला असे समजले आहे की अमेरिकन पद्धत अणि त्यांच्या कायद्यानुसार अधिकृत अध्यक्ष जाहीर करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया अजून पुर्ण व्हायची आहे. त्यामुळे चीनने अजून बायडेन यांचे अभिनंदन केलेले नाही.
अमेरिकेत बायडेन यांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी अजून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही. त्यातच त्यांना रशिया, चीन आणि मेक्सिको सारख्या देशांचीही अनुकूल प्रतिक्रिया लाभत असल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा विषय आता चांगलाच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.