सतना – मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात डंपर आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे.
या अपघातातील सर्व मृत रिवा येथील रहिवासी होते. पन्ना येथे एका शोक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण गेले होते. घराकडे परत येत असताना एका वेगवान डंपरने त्यांच्या वाहना समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात सकाळी 8 वाजेच्या सुमारास सतना-नागोद मार्गावर घडला. यात 6 जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथून त्यांना रिवाच्या मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. वाहनात एकूण 12 जण प्रवासी होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार जैन यांनी दिली. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले आहे.