आयकर भरत असतानाही किसान “सन्मान’चा लाभ
पुणे – आयकर भरत असतानादेखील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील 16 हजार 110 शेतकऱ्यांना नोटीस देण्याचे काम तहसीलदार यांच्याकडून सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून एकूण सुमारे 14 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करून पुन्हा केंद्र शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
आयकर भरत असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या बारामती तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील 2 हजार 394 शेतकऱ्यांना नोटीस बजवाण्यात येणार आहे. त्याखालोखाल जुन्नर-2,140 तर शिरुरमध्ये 1,925 शेतकऱ्यांना संबंधीत रक्कम भरण्याच्या नोटीस दिल्या जाणार आहेत.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही योजना सुरू केली आहे. तिचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने अटी घातल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने संबंधीत शेतकरी हा आयकर भरणारा असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. तरीसुद्धा काही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत.
केंद्र शासनाने या योजनेतील सर्व शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी तसेच पॅनकार्ड क्रमांकावरून आयकराची माहिती जमा केली असता, जिल्ह्यातील 16,110 शेतकरी आयकर भरत असल्याचे लक्षात आले. या सर्व शेतकऱ्यांना एकूण सुमारे 14 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
तालुकानिहाय लाभ घेतलेले सधन शेतकरी
आंबेगाव तालुक्यातील 1 हजार 171, भोरमधील 633, दौंडमधील 1 हजार 673, हवेली तालुक्यातील 692, इंदापूरमधील -1 हजार 37, खेडमधील 1 हजार 473, मावळ-538, मुळशी-830, पुरंदर-1 हजार 332 आणि वेल्हा तालुक्यातील 272 नोटीस बजावून त्यांच्याकडून धनादेशाद्वारे ही रक्कम जमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.