पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतली जाणारी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 31 जानेवारीला देशभरातील 135 केंद्रांवर घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठी केंद्र बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दि. 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन बदल करण्याची परवानगी सीबीएसईने दिली आहे. सीटीईटी यंदा दि.5 जुलैला 112 केंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र करोना संसर्गामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती दिली आहे.
करोना संसर्गाच्या पाश्वृभूमीवर परीक्षा होत असल्याने सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने 31 जानेवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक उमेदवारांकडून केंद्र बदल करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. ही विनंती मान्य करून सीबीएसईने दि. 11 नोव्हेंबरपर्यंत केंद्र बदलण्याची संधी दिली आहे.
उमेदवाराने निवडलेल्या केंद्रावर संधी उपलब्ध न झाल्यास उमेदवाराने निवडलेल्या अन्य चारपैकी एक केंद्र देण्यात येईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.