पुणे – मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकच्या भावात घट झाली आहे. कोथिंबिर आणि कांदापातच्या भावात घाऊक बाजारात सर्वाधिक जुडीमागे 10 रुपयांनी घसरण झाली आहे.
त्या खालोखाल चुक्याच्या भावात सहा रुपये, चवळई आणि पालकच्या भावात जुडीमागे प्रत्येकी पाच रुपये, मेथी, शेपू आणि करडईच्या भावात प्रत्येकी चार रुपये, चाकवत आणि राजगिराच्या भावात
जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली आहे. तर केवळ अंबाडीचे भाव जुडीमागे दोन रुपयांनी वाढले आहेत.
रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीची दोन लाख जुड्यांची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती. मेथीची गेल्या आठवड्यात 60 हजार जुडी आवक झाली होती. जी या आठवड्यात 80 हजार जुडी आवक झाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 100-1000, मेथी : 500-1000, शेपू : 400-600, कांदापात : 1500-2000, चाकवत : 500-800, करडई : 500-600, पुदिना : 300-500, अंबाडी : 500-800, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-600, चुका : 500-600, चवळई : 300-500, पालक : 700-1000.