बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर याचा या वर्षी “कबीर सिंह’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर तो आपल्या आगामी “जर्सी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.
बॉलिवूडमध्ये लवकरच “जर्सी” या तेलुगू चित्रपटाचा रिमेक तयार होणार असून, या चित्रपटात सुद्धा शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट एक स्पोर्टस ड्रामा असणार आहे. नुकतंच या चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘जर्सीसाठी तयारी.. दे दना दन’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये शाहिदचा लूक हा ‘कबीर सिंग’ चित्रपटातील लूकसारखाच आहे. हातात ग्लोव्ह्ज आणि बॅट घेऊन शाहिद क्रिकेट खेळण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या “जर्सी’त शाहिदच्या ऑपोजिट मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या “जर्सी’चा हिंदी रीमेक आहे. तेलुगू चित्रपटात नवीन बाबू घंटा उर्फ नानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.