कमला हॅरिस यांची बोलकी प्रतिक्रिया चर्चेत…

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्याक्षपदी झाल्या नियुक्त

वॉशिंग्टन – कोणाही भारतीय महिलेने मिळवलेल्या आजवरच्या कोणत्याही महिलेपेक्षा मोठा सन्मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला असून, अमेरिकेतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत, त्यांनी हा सन्मान प्राप्त केला आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सत्ताकेंद्रातील दुसरे महत्त्वाचे स्थान मिळवत हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. आपल्या विजयासह नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या यशाविषयी हॅरिस यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वत्र समाजमाध्यमांत चर्चेचा विषय ठरली आहे.
हॅरिस म्हणाल्या की, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातल्या सर्वोच्च दुसऱ्या स्थानी प्रथमच एक महिला आणि जी गोरी नाही; कृष्णवर्णीय आहे, ती विराजमान होत आहे, ही खरेच ऐतिहासिक गोष्ट आहे. अमेरिकन नागरिकांनी एका परदेशी मूळ असलेल्या महिलेवर जो विश्‍वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचे आव्हान मी पेलणार आहेच. पण या कार्यालयामध्ये येणारी मी पहिली महिला, पहिले कृष्णवर्णीय स्त्री असले, तरी असे करणारी मी अखेरची व्यक्ती नसेन. रंगभेद-वंशभेद बाजूला ठेवत, अमेरिकन्स ज्या पद्धतीने व्यक्तीच्या कार्याला महत्त्व देतात, त्याचप्रमाणे माझ्यानंतरही आता अशा अनेक महिला, कृष्णवर्णीय महिलांना यामधून प्रेरणा मिळेल, असा मला विश्‍वास आहे. वर्णद्वेष आणि वांशिक भिन्नतेवरुन होणारे मानवजातीचे विभाजन हे प्रत्येकच संवेदनशील मनाला यातना देणारे असते. त्यामुळे हे भेद दूर करणे आणि सर्वांना समन्यायी बुद्धीने पहाणे, आजच्या काळात सर्वाधिक गरजेचे आहे.
ब्रिटीश जमैकातून अमेरिकेत 1961 मध्ये आलेले आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ज्ञ, डोनाल्ड हॅरिस यांनी भारतातल्या नामिळनाडूमधून आलेल्या जीवशास्त्रज्ञ श्‍यामला गोपालन यांच्याशी विवाह केला. त्यांचे अपत्य असलेल्या कमलादेवी हॅरिस यांनी हॉर्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांचे पती डग्लस एमॉफ हे व्यवसायाने वकील आहेत. ते आता दुसरे “प्रथम नागरिक’ बनतील. कमला हॅरिस आता माईक पेन्स यांची जागा घेतील.
हॅरिस यांच्या या प्रतिक्रिचे व्हिडिओज आणि पोस्टस अमेरिकन समाजमाध्यमांत चर्चेत असून, “वुई लव्ह कमला हॅरिस’ असे फलक अनेकांनी आपल्या वॉलवर प्रदर्शित केले आहेत. तसेच त्यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक फॉलोअर्सच्या संख्येतही क्षणोक्षणी वाढ होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.