सातारा – प्राथमिक शिक्षक सहकारी बॅकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रांवर दुपारी चारपर्यंत चुरशीने पण शांततेत 98 टक्के मतदान झाले. कै. शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे सभासद विकास पॅनेल, संभाजीराव थोरात गट शिक्षक संघ आणि शिक्षक समितीचे सभासद परिवर्तन पॅनेल, तसेच तिसरे स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत असलेल्या या निवडणूकीत 59 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. उद्या (रविवारी) सकाळी आठ वाजता मतमोजणी होऊन सकाळी दहापर्यंत सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांचा पहिला निकाल जाहीर होणार आहे.
त्यामध्ये बॅंकेच्या सुज्ञ सभासदांनी कोणाला कौल दिला हे समजणार आहे. बॅंकेच्या निवडणुकीत यावर्षी प्रथमच तिरंगी लढत झाली. कै. शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाने शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली सभासद विकास पॅनेल टाकले होते. तर शिक्षक संघाचे दुसरे नेते संभाजीराव थोरात व माजी अध्यक्ष बलवंत पाटील यांनी शिक्षक समितीचे नेते व राज्याध्यक्ष उदय शिंदे व दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ यांनी एकत्र येत सभासद परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार दिले होते. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीचे तिसरे पॅनेलचे 12 उमेदवार रिंगणात होते.
तसेच पाच अपक्ष उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात होते. संचालकांच्या 21 जागांसाठी तीन पॅनेलचे 59 उमेदवार रिंगणात होते. आज या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावर चुरशीने 98 टक्के मतदान झाले. प्रत्येक केंद्रावर मतदानासाठी गुरुजींना आणण्यासाठी प्रत्येक पॅनेलने व्यवस्था केली होती. त्यामुळे चुरशीने पण शांततेत 98 टक्के मतदान झाले. एकूण 9669 मतदान असून दुपारी चारपर्यंत.9474 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
केंद्रनिहाय मतदान व टक्केवारी अशी आहे कराड एक (340) 97.14, कराड दोन 313 (96.60), पाटण 478 (96.96), नागठाणे 642 (91.19), सातारा 588 (86.09), परळी 310 (95.68), मेढा 650 (96.58), महाबळेश्वर 267 (93.68), वाई 483 (95.83), भुईंज 276 (96.84), खंडाळा 505 (96.74), फलटण एक 676 (93.89), फलटण दोन 598 (97.08), कोरेगाव 543 (95.77),रहिमतपूर 510 (96.96), खटाव 489 (95.14), मायणी 559 (93.79), दहिवडी 521 (97.20), म्हसवड 426 (95.30).