पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांतील 92 टक्के बेड फुल

प्रशासनाची दमछाक : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढविली


येत्या दोन दिवसांत निर्माण होऊ शकते बेड्‌सची टंचाई

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कररोना दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला असून पालिकेच्या रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. पालिका रुग्णालयातील एकूण बेडपैकी अवघे 8 टक्के बेड रिकामे आहेत. तसेच दररोजच्या वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाहता येत्या दोन दिवसांत हे बेड फुल्ल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऍटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर बालनगरी कोविड केअर सेंटरमध्येही उपचार करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त काही खासगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र तेथील उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होतात. पालिकेच्या रुग्णालयांवरच रुग्णांची भिस्त असताना शहरातील बेड संपत आल्याने चिंता वाढली आहे.

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये 1144 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 1059 बेडवर रुग्ण असून अवघे 85 बेड शिल्लक आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये 1825 बेड असून त्यापैकी 658 बेडवर रुग्ण आहेत. तर 1167 बेड रिकामे आहेत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे बाधित आढळल्यानंतर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये भरती होण्याची संख्या जास्त आहे. मात्र, बेड अपुुरे पडत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे.

पालिकेच्या रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजनविरहित 60 बेड असून त्यापैकी फक्त 17 बेड शिल्लक आहेत. ऑक्‍सिजन बेड 452 असून त्यापैकी 42 बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटर नसलेले आयसीयू 38 असून त्यापैकी एकही आयसीयू शिल्लक नाही. तर व्हेंटिलेटरसह आयसीयू 44 असून त्यापैकी 26 आयसीयू शिल्लक आहेत. पालिका रुग्णालयातील बेड पूर्ण क्षमतेने भरत आले आहेत. खासगी रुग्णालयांमधील बेड शिल्लक असले तरी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च आकारला जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात भरती होण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पालिकेचे बेड फुल झाले आहेत. त्यामुळे भोसरी व जिजामाता रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था वाढविण्यात येणार आहे. तसेच जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. त्यानुसार निर्देश देण्यात आले आहे. रुग्णांसाठी पुरेशा बेडची व्यवस्था करून देण्यात येईल.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य अधिकारी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.