लाहोर, – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी संबंधित 9 संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांच्या “काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट’ने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही माहिती दिली आहे.
कोणत्याही अप्रिय दहशतवादी कावायांना रोखण्यासाठी संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये गेल्या आठवड्यात गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित 9 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आले, असे या निवेदनात म्हटले आहे. सदाम हुसेन, आबिद उल्ला खान, मुहम्मद मंजूर आणि मुहम्मद अर्शद असे चार दहशतवादी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे आहेत.
मोहम्मद रियाझ आणि सय्यद तकीउल हसनैन हे दोन दहशतवादी सिपाह-ए-मुहम्मद पाकिस्तान या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य होते. अल-कायदाचा सक्रिय सदस्य जमील उर रहमान यालाही अटक करण्यात आली आहे. खालिद मेहमूद हा लष्कर-ए-जांघवीचा सदस्य असून नावेद अख्तर परदेशी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता, असे निवेदनात म्हटले आहे.
या सर्वांकडून पाच किलो स्फोटके, 40 डिटोनेटर्स, पाच हातबॉम्ब, एक पिस्तूल, सहा गोळ्या, 154 धोकादायक साहित्य आणि एक पोटोहार जीप जप्त करण्यात आली आहे. या सर्वांच्याविरोधात स्वतंत्रपणे एफआयआर दाखल करण्यात आली असून त्यांना अज्ञात ठिरकाणी हलवण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी कार्यालये आणि लोकप्रतिनिधींच्या ठिकाणांवर तसेच वेगळ्या समुदायाच्या लोकांवर घातपाती हल्ले करण्याचा कट हे दहशतवादी करत होते, असेही “काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.