बंगळुरू – चांद्रयान-3 च्या “प्रज्ञान’ रोव्हरने बुधवारी सकाळी विक्रम लॅंडरचा फोटो क्लिक केला. रोव्हरवर दोन नेव्हिगेशन कॅमेरे आहेत, ज्यावरून हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. हे कॅमेरे चांद्रयान-3 मोहिमेसाठी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टमच्या (एलईओएस) प्रयोगशाळेने विकसित केले आहेत.
चांद्रयान-3 चे लॅंडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्रावर उतरले. यानंतर 14 तासांनी चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर बाहेर आला. त्यानंतर सहाव्या दिवशी (29 ऑगस्ट) चांद्रयानाने दुसरे निरीक्षण पाठवले.
यानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सल्फरसह चंद्राच्या पृष्ठभागावर ऍल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियमची उपस्थितीदेखील आढळून आली आहे.
याशिवाय चंद्राच्या मातीत मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनदेखील आहे, तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. म्हणजेच आतापर्यंत चंद्राच्या मातीत एकूण 9 मूलद्रव्ये सापडली आहेत. एलआयबीएस म्हणजे प्रज्ञान रोव्हरवर बसवलेले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप पेलोड आहे, ज्याने ही निरीक्षणे पाठवली आहेत.
ऑक्सिजनमध्ये थेट श्वास घेता येत नाही…
चंद्राच्या मातीवर आढळणारा ऑक्सिजन थेट श्वास घेता येईल अशा स्वरूपात नसला तरी तो ऑक्साईड स्वरूपात आहे. याआधी नासालाही चंद्राच्या मातीत ऑक्सिजन आढळून आला होता. त्यामुळे इस्रोला आधीच इथे ऑक्सिजन मिळण्याची शक्यता होती.
ऑक्साइड ही रासायनिक संयुगाची एक श्रेणी आहे. त्याच्या संरचनेत घटकासह एक किंवा अधिक ऑक्सिजन अणू असतात. जसे “एलआय2ओ’, सीओ2, एच2ओ(पाणी)इ. त्यामुळे ऑक्सिजन मिळाल्यानंतर इस्रो आता “एच’ म्हणजेच हायड्रोजनचा शोध घेत आहे.