पुणे: कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कुटुंबाना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. एक आजी आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी पुण्यातील रस्त्यावर लाठ्याकाठ्या फिरवत आहे.
शांताबाई पवार या आजीचं नाव असून त्या पुण्यातील हडपसर परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. ह्या ८५ वर्षाच्या आजी तरुणांना लाजवेल अशी लाठी-काठी फिरवतात आणि कुटुंबासाठी पैसे जमवतात. कोणी १० रुपये देते, कोणी ५ तर कोणी २ रुपये सुद्धा देतं. ते गोळा करून शांताबाई पवार अनाथ लेकरांच्या स्वयंपाकाची सोय करतात. त्यांच्याकडे आई-वडील नसलेले बरेच अनाथ मुल आहेत.
लॉकडाऊनमुळे या आजींनी बरेच दिवस घरात काढले. पण आपल्या मुलांची भूक त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे एकीकडे जग कोरोनाशी लढत असताना ह्या आजी भुकेशी लढायला निघाल्या. पुण्यातील रस्त्यावर लाठी-काठीच्या कसरती दाखवत त्यांनी पैसे गोळा केले. त्यामुळे त्यांच्या मुलांची खाण्याची सोय झाली.
शांताबाई पवार सांगतात, लॉकडाऊन असल्यामुळे मी उधारी मागायला गेले. पण कोणी दिली नाही. मी मेले तर माझ्या लेकरांचं काय होईल? काहींनी म्हाताऱ्या लोकांना कोरोना होती अशी भीती दाखवली. मी म्हटलं कोरोना झाला तर घराचं तोंड बघणार नाही. तिथेच मरेन. पण मी बाहेर पडल्यावरच माझ्या मुलांचं पोट भरेल. देवाने मला असं ठेवलंय की मला कोणता कोरोनाही नाही.