शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत 85 स्वराज्यरथ होणार सहभागी

गौरवशाली इतिहास मांडण्याचा प्रयत्न : रणरागिणींच्या शौर्य पथकाचाही असेल समावेश

पुणे – शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बुधवारी (दि.19) सकाळी 9 वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन केले आहे.

सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 85 स्वराज्यरथांचा सहभाग या मिरवणुकीत आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अमित गायकवाड यांनी दिली. यावेळी संगीतकार अजय-अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आदी उपस्थित राहणार आहेत.

समितीच्या “जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत’ मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निवंगुणे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, प्रतापगड युद्धवीर सहस्री सरदार रामजी पांगारे, आदी स्वराज्यरथ गौरवशाली इतिहास मांडणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

शिवरायांच्या पुतळ्यावर होणार पुष्पवृष्टी
शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या रणरागिणींचे शौर्य पथक युद्धकला सादर करणार आहेत. शिवगर्जना ढोलताशा पथक, रणशिंग, ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक सहभागी होणार आहे. तर सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे आणि प्रतापगड युद्धवीर कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. एसएसपीएमएस शाळेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सकाळी 11 वाजता पुष्पवृष्टी होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.