अहमदाबाद – गुजरातमधील विधानसभेच्या 8 जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी एकूण 81 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
गुजरात पोटनिवडणुकीसाठी 102 उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. अखेरच्या दिवशी 21 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पोटनिवडणुकीत आता 81 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यामध्ये 51 अपक्षांचा समावेश आहे.
कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानसभेच्या 8 जागा रिक्त झाल्या. त्या जागांसाठी प्रामुख्याने भाजप आणि कॉंग्रेस उमेदवारांमध्येच टक्कर होणार आहे. दोन्ही पक्षांनी ती पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्या पोटनिवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमपिच असल्याने गुजरात पोटनिवडणुकीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे.