श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे 2 दिवसांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 5 वर पोहचली.
शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी सोमवारी सायंकाळी मोहीम हाती घेतली. त्यानंतर झालेल्या चकमकीत काही काळातच एक दहशतवादी मारला गेला. घटनास्थळी दडलेला त्याचा साथीदार मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू झालेल्या चकमकीत ठार झाला. चकमकस्थळावरून मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडील एके रायफल आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आले. दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यात झाली. त्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले.
त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. दोन्ही चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. मात्र, त्यांचा खात्मा हा दहशतवादी संघटनांसाठी मोठा दणका मानला जात आहे.