सिमला – हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात खराब हवामान आणि तुफानी पावसामुळे 80 प्रवासी अडकून पडल्याचे वृत्त आहे. त्या ठिकाणी कारमधून गेलेल्या 11 पर्यटकांचाही त्यात समावेश आहे. हे प्रवासी बातल येथे अडकून पडले आहेत.
अन्य काही जण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आश्रयाला असून, बाकीचे बातल येथील चाचा चाची रेस्ट हाऊस येथे वास्तव्याला आहेत. या सर्व लोकांना छोट्या वाहनातून तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेले काही दिवस हिमाचल प्रदेशच्या बऱ्याच भागाला पावसाने मोठा तडाखा दिल्याने तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून, पर्यटकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. या राज्याला अजूनही पावसाचा धोका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.