वॉशिंग्टन – चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. त्याबद्दल खुद्द अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनने अलीकडेच गुप्तपणे ही अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून या घटनेविषयी तातडीने आश्चर्य व्यक्त केले गेले.
चीनने केलेली ही चाचणी चिंतेचा विषय आहे, असे अध्यक्ष बायडेन यांनी आज व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. चीनची ही क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने लक्षावर मारा करू शकतात. चीनने मात्र या वृत्तविषयी कानावर हात ठेवले आहेत. त्यांनी म्हटले आहे की आम्ही हायपरसॉनिक न्युक्लिअर क्षेपणास्त्रांची नव्हे तर हायपरसॉनिक व्हेईकलची चाचणी घेतली आहे.
ब्रिटिश वृत्तपत्रानेही या क्षेपणास्त्र चाचणीविषयीचे वृत्त दिले आहे पण त्यात त्यांनी म्हटले आहे की चीनची ही चाचणी यशस्वी होऊ शकलेली नाही. त्यांचे लक्ष्य किमान 24 मैल अंतराने हुकले आहे. त्यामुळे ही चाचणी अपयशी ठरल्याचे या वृत्तपत्राने नमूद केले आहे. चाचणीच्यावेळी या क्षेपणास्त्राने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या लक्षाच्या दिशेने झेप घेतली.
हे क्षेपणास्त्र अमेरिकेवरही कोणत्याही अनपेक्षित दिशेने आण्विक हल्ला करू शकणार आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. दरम्यान, अमेरिकाही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. या क्षेपणास्त्राच्या अमेरिकेतील साऱ्या प्राथमिक तपासण्या यशस्वी झाल्या आहेत.