पुणे,दि.17- सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढल्या प्रकरणी पोलिसांनी 80 जणांना अटक केली आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून याप्रकरणी संबंधिताच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
शनिवारी दुपारी तब्बल 150 ते 200 जणांनी सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढली होती. माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती. टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता.
त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे 100 ते 125 जणांनी दुचाकीवरून रॅली काढली.टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांच्या 15 पथकाकडून आरोपीची धरपकड सुरू करण्यात आली.
“रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.नियमांचे उल्लंघन करून अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्याची धरपकड सुरू आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपी तसेच वाहने ताब्यात घेण्यात येत आहे.” – सागर पाटील, (पोलीस उपायुक्त, झोन दोन)