घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा; रुपाली चाकणकर यांची मोदींवर टीका

पुणे : भारतामध्ये लसीकरणावरून मोठे राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसी देत असल्याचे दिसत आहे. मात्र, आपल्या देशांमध्ये लवकरात लवकर नागरिकांना लस द्यावी अशी इच्छा केंद्र सरकारची नाही का ? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आक्रमक झाल्या आहेत. घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे.

घरात नाही दाणा पण मला “वॅक्सिन गुरू” म्हणा…भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल, अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

भारतातील मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मृत्यूच्या बाबतीत, रुग्ण संख्येच्या बाबतीत दिवसेंदिवस देशात नवनवीन विक्रम केले जात आहेत. देशातील परिस्थिती आटोक्यात यायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. याच गोष्टीमुळे अजूनही परिस्थिती आटोक्यात यायला तयार नाही. राजकारण सोडून ठाम अशी भूमिका केंद्र सरकारने घ्यायला हवी, असा सूर विरोधी पक्षाकडून होताना दिसत आहे.

महापालिकेकडे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींचे डोस संपले असून शासनाकडून नव्याने लशीचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याने आज सोमवारी पुणे शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.