तामिळनाडूच्या करोना लढ्याला रजनीकांत यांचा हातभार; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश

चेन्नई – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने मोठे आव्हान उभे केले आहे. या लाटेमध्ये रुग्णसंख्येबरोबरच मृत्यू दरातही वाढ झाल्याचे दिसून आले. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, व औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकटसमयी समाजातील दानशूर व्यक्ती धावून येत आहेत. अशीच मदत आज सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे.

अभिनेते रजनीकांत यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या करोना विरोधी लढ्यासाठी 50 लाख रुपयांची मदत केली. तसेच राज्यातील जनतेला आवाहन करताना त्यांनी, करोना संबंधातील खबरदारीच्या उपायांचे पालन करण्यास सांगितले.

दरम्यान, देशातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना या लढ्यात अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओहोटीस लागल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. मात्र तज्ज्ञांनी विषाणूची आणखी एक लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला असून यामुळे विषाणू संसर्गासंदर्भातील सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.