गोपेश्वर, (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेजवळ चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून सीमा रस्ते संघटनेच्या आठ कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री नीती खोऱ्यामध्ये सुमना भागात घडली. घटनास्थळावरून दोन कामगारांचे मृतदेह काल रात्रीच सापडले तर उर्वरित सहा जणांचे मृतदेह आज सापडल्याचे जिल्हा दंडाधिकारी स्वाती भदौरिया यांनी सांगितले. जखमी झालेल्या चौघा जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून अधिक बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री तिरत सिंह रावत यांनी जोशीमठ येथे पत्रकारांना ही माहिती दिली.
डोंगराचा कडा कोसळला तेव्हा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे 400 पैकी 391 कामगार इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस तळावर सुखरूपपणे पोहोचले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घटनास्थळाचा हवाई दौरा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
दुर्घटना घडलेले सुमना हे ठिकाण मलारी गावापासून 25 किलोमीटर अंतरावर, गिरथीगड आणि किओगडच्या संगमाजवळ आहे. हे दोन्ही प्रवाह धौली गंगेचे असून याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात हिमकडा नदीच्या पाण्यात कोसळून 80 जणांचा मृत्यू झाला होता, तर 126 जण बेपत्ता झाले होते.
आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदत आणि बचावकार्य करत आहेत. मात्र मोठा हिमवर्षाव सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बचावकार्यासाठी सर्व मदत देण्याची ग्वाही दिली असल्याचे रावत म्हणाले.
1991 साली सुमना भागामध्ये असाच प्रकार झालेल्या दुर्घटनेमध्ये आयटीबीपीचे 11 जवान मरण पावले होते.