डेहराडून – उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 11 जण बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेतला जातो आहे. राज्याच्या द्रौपदी दंड पर्वतीय क्षेत्रात ही दुर्घटना घडली असून मरण पावलेले व बेपत्ता असलेले नेहरू पर्वरोहण संस्थेचे सदस्य आहेत. हिमस्खलनामुळे अडकून पडलेल्या या गिर्यारोकांच्या सुटकेचे काम हाती घेण्यात आले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही ट्वीट करून याबाबतची माहिती दिली. किमान दोन डझनपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक येथे गेले होते. आता त्यांच्या सुटकेसाठी एनडिआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि आयटीबीपीचे जवान पाठवण्यात आले आहेत. मदतकार्य वेगात व्हावे आणि अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका करण्यासाठी भारतीय हवाई दलाची दोन चिता हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान, अडकून पडलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी 8 जणांना वाचवण्यात आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आतापर्यंत यश मिळाले असल्याचे उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडुन देण्यात आली आहे.