गावठी दारू भट्टीवर हातोडा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कामशेत – पवन मावळातील सर्वात मोठ्या गावठी दारू भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 24) सायंकाळी कारवाई करून एक लाख 64 हजार रुपयांचे दारूचे रसायन उद्ध्वस्त केले आहे.
पवन मावळातील कडधे येथील ओढ्यालागत गावठी दारू भट्टी उभारून ओढ्याचे पाणी वापरून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गावठी दारूची निर्मित्ती करून तालुक्यातील वेगवेगळ्या भागात विक्री करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक स्वाती भरणे यांना मिळाली होती.
त्यानुसार निरीक्षक राजाराम खोत, उपनिरीक्षक स्वाती भरणे, उपनिरीक्षक संजय हांडे, सहायक दुय्यम निरीक्षक अशोक राऊत, जवान राहुल जवंजाळ, भागवत राठोड, भगवान रनसुरे, हनुमंत राऊत यांच्या पथकाने कडधे येथील गावठी दारू भट्टीचा शोध घेऊन कारवाई करत 5 हजार लीटर रसायनाची विल्हेवाट लावली.
गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त केली आहे, तसेच डोंगरगाव येथे सुरू असलेली गावठी दारू भट्टीवर कारवाई करून 2 हजार 800 लिटर रसायनाची विल्हेवाट लावली आहे, असे एकूण 1 लाख 64 हजार रुपयांच्या 7 हजार 800 लीटर रसायनाची विल्हेवाट लावली आहे.