मंचर- पेठ येथील दोन आणि एकलहरे (ता. आंबेगाव) येथील दोन दुकानमालकांनी दुकाने उघडी ठेवून गर्दी करून करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार दुकानमालकांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान एस.आर. मांडवे, राजेंद्र हिले पेट्रोलिंग करत असताना पुणे-नाशिक रस्त्यालगत एकलहरे येथे सुनंदा दत्तात्रय कुरकुटे (वय 45, रा. एकलहरे) आणि रवींद्र बबन गुळवे (वय 48, रा. एकलहरे) यांनी त्यांची हॉटेल चालू ठेवली होती. या दोघांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्याप्रमाणे पोलीस जवान प्रशांत भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस जवान राजेंद्र हिले करत आहे.
याबरोबरच पेठ (ता. आंबेगाव) येथे चंद्रकांत हरिभाऊ शेलार (वय 55) यांनी आपले हॉटेल सुरू ठेवले, तर अनिल मनोहर शिंदे (वय 40) यांनी भाजीपाला दुकान सुरु ठेवले होते. या दोन दुकानदारांवर देखील मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान अजित मडके, एस. आर. मांडवे, सुदर्शन माताडे यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान कैलास कड करीत आहेत.