पुणे : कोरोना रुग्णांच्या कुटूंबियांची तपासणी करण्यासाठी निवास्थानी गेलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक केली आहे. करोना रुग्णाला दवाखान्यात दाखल करून घेत नाही, मग सर्व्हे कशाला करायला येता अशी विचारणा करत ही मारहाण करण्यात आल्याचे समजते.
कैलास डेमाजी पहिलवान (वय 50) आणि किरण शंकर पहिलवान (वय.40, दोघेही, रा. निता,अपार्टमेंट, खडकी ) अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत डॉ. शाहीन कुजंयप्पन चारतामकुढत (वय.49,रा. ऑर्डीनस इस्टेट) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रेंजहिल इस्टेट परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन चारतामकुढत हे खडकीतील ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तीन महिलांसह सहा जणांवर मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.