पुणे – ऑनलाईन मोबाईल रिचार्ज न झाल्याने त्याच्या 399 रुपयांच्या रिफंडासाठी एकाने गुगपे पे हेल्प लाईनवर संपर्क केला. मात्र हा संपर्क करणे त्याला तब्बल 77 हजार रुपयांना महागात पडले. भामट्याने त्याच्या खात्यातून 77 हजार रुपयांची रक्कम वर्ग करुन घेतली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्वती दर्शन येथे रहाणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने त्याच्या मित्राच्या मोबाईलवरुन 399 रुपयांचे रिचार्ज गुगल पे व्दारे केले होते. मात्र मोबाईल रिचार्ज न झाल्याने त्याने गुगल पे हेल्प लाईनवर कॉल केला. त्याला समोरच्या व्यक्तीने एनि डेस्क नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. यानंतर त्याच्याकडील एटीएमकार्डची माहिती आणि ओटीपी घेतला.
त्यानंतर फिर्यादीच्या बॅंक खात्यातून चार वेगवेगळे ट्रांन्सजॅक्शन करुन 77 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरुन दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे करत आहेत.