“मनसे’ पुढाकार : डोंगरवाडी गावाला मिळाली अजून एक ओळख
वडगाव मावळ – नागमोडी व अवघड पाऊल वाट असणारी तसेच उर्से ग्रामपंचायत हद्दीत येणारा डोंगर म्हणजेच डोंगरवाडी गाव जेमतेम 15-20 घराचा व 100 ते 125 लोकसंख्या असणारा हा डोंगरमाथ्यावरील भाग दुर्गम व दुर्लक्षित असल्याकारणाने अनेक वर्षांपासून सुख-सुविधांच्या अभावामुळे वंचित राहिला होता. महावितरणच्या मदतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डोंगरवाडी लख्ख करण्यात अनमोल परिश्रम घेतले.
गेल्या काही काळात गावाला वीज व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत. परंतु गावकऱ्यांच्या रोजच्या वापरासाठी व दैनंदिन दळणवळणासाठी उपयुक्त व सोयीस्कर असणारा रस्ता वरदायनी मंदिर (वडगाव) ते डोंगरवाडी असा असून, त्या पाऊलवाटेवर अनेक वर्षांपासून पथदिवे व विजेची सोय नसल्याने रस्त्यावर रात्रीच्या वेळी खूप मोठा काळोख पसरत होता. त्यामुळे डोंगरावर राहणाऱ्या ग्रामस्थांना (शालेय विद्यार्थी, कामगार, दूधव्यवसायक, शेतकरी) तसेच डोंगराच्या निसर्ग सानिध्यात ट्रेकिंग व भटकंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अंधारातून वाट शोधायला मोठी कसरत करावी लागत होती.
त्याचप्रमाणे अंधाराचा फायदा घेऊन वाटेवर अनेक हिस्त्र वन्यजीव व नरभक्षक प्राण्यांचा खुलेआम वावर अधून-मधून रस्त्यावर आढळून येत होता. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. याअनुषंगाने नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेऊन व डोंगरवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार वैयक्तिक स्वखर्चातून व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून वरदायनी मंदिर ते डोंगरवाडीगाव या रस्त्यावर विद्युत पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसविण्यात आले.
गेले 20 ते 25 वर्षांपासून हा रस्ता व डोंगर अंधाराच्या छायेखाली दडला गेला होता. मात्र मनसेच्या या समाजोपयोगी कामातून डोंगर विद्युत पथदिव्यांनी प्रकाशात उजळून निघाला. तसेच अचानक प्रकाशमय झाल्याने डोंगरवाडीचा डोंगर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
या उपक्रमास नवनाथ शिवेकर, विकास साबळे, आकाश वारिंगे, सोमनाथ नवघणे, संतोष म्हाळसकर, सुरेश धनावडे, मिलिंद भवार, लहूदास म्हाळसकर, युवराज भोसले, गणेश म्हाळसकर, ओंकार भांगरे, विक्रम कदम यांचा हातभार लागला. महावितरण आणि कानिफनाथ तरूण मंडळ, डोंगरवाडी यांचे सहकार्य लाभले.