आंबिलओढा दुरुस्तीसाठी 77 कोटींचा प्रस्ताव

कल्वर्ट, अतिक्रमणे, गाळ काढण्याचे पहिल्या टप्प्यात नियोजन

पुणे – सप्टेंबरअखेरीस दक्षिण पुण्यात सलग आणि मुसळधार पावसाने आंबिल ओढ्याला आलेल्या महापुराचा फटका शेकडो घरांना बसला आहे. त्याच वेळी ओढ्यावरील छोटे पूल तसेच सीमाभिंतीही वाहून गेल्या आहे. त्यामुळे या ओढ्यात निर्माण झालेली झालेली धोकादायक परिस्थिती दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 77 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहीती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सप्टेंबरअखेरीस दक्षिण पुण्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या भागातून वाहत येणाऱ्या आंबिल ओढ्याला महापूर येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुराचा फटका तब्बल दहा हजार नागरिकांना बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर या ओढ्यावरील छोटे पूल, कल्व्हर्ट यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या घटनेनंतर पालिकेने प्रायमुव्ह संस्थेमार्फत या ओढ्याचे सर्व्हेक्षण करुन त्यावरील कामांसाठी तब्बल 300 कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात या ओढ्यावरील अतिक्रमणे हटविणे, भविष्यात पुन्हा पुराचा फटका बसू नये यासाठी संरक्षक भिंत बांधणे, वाहून गेलेले कर्ल्व्हट बांधणे, अतिक्रमणे हटविणे, पूल बांधणे अशा कामांचा समावेश आहे. त्यामधील काही कामे तातडीने करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात होणार ही कामे
प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात 21 ठिकाणी कल्वर्ट बांधण्यात येणार असून पुढील वर्षी पुन्हा पुराचा धोका उद्‌भवू शकतो अशा भागातील पडलेल्या सीमाभिंत तातडीने बांधण्यात येणार आहेत. तसेच नाल्यावरील पूल वाहून गेल्याने ज्या भागातील नागरिकांना रस्ता नाही, त्या भागात तातडीने पुलाची कामे केली जाणार आहेत. याशिवाय, पालिकेने या ओढयाचे सर्वेक्षण करून घेतले असून या सर्वेक्षणानुसार तातडीनं काढावी लागणारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच आवश्‍यक त्या भागात नाल्याची खोली आणि रुंदी वाढविण्याचे कामही या निधीतून केले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.