नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून आर आर आर या चित्रपटाच्या ऑस्करवारीची जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटाला ऑस्कर भेटावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा होती. त्यात नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर पुरस्काराबाबतची उत्सुकता आणखी वाढली होती. अखेर हा सस्पेन्स संपला असून, ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे.
एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ऑस्कर पुरस्कार पटकावणारं ‘नाटू नाटू’ हे पहिलंच भारतीय गाणं ठरलं आहे. या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी हे पारितोषिक स्वीकारलं आहे.
ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर फक्त देशातूनच नाहीतर संपूर्ण जगातील विविध भभागात ‘नाटू नाटू’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक सिलेब्रिटी आणि सामान्य लोक देखील या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. अश्यातच आता या गाण्यावर डान्स करण्याचा मोह सुनील गावस्कर यांनाही आवरला नाही. सध्या सोशल मीडियावर त्यांच्याही डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुनील गावस्कर यांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर या गाण्यावर डान्स केला. 73 वर्षीय गावस्कर यांचा उत्साह पाहून नेटकरीसुद्धा चकीत झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कॉमेंट्री करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी सूत्रसंचालक जतिन सप्रू याच्या सोबत ‘नाटू नाटू’ या गाण्यावर ठेका धरला होता. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.