मोहंमद अलींचें भव्य स्वागत
अली पती-पत्नींवर पुष्पवृष्टी; थाटाची मिरवणूक
नवी दिल्ली, ता. 16 : काश्मीरमधील अलीकडे घडलेल्या घटनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचें पंतप्रधान मोहंमद अली आज सायंकाळी विमानानें येथें येऊन दाखल झाले. ते दिल्ली विमानतळावर येतां क्षणींच त्यांचे भारत सरकारतर्फे भव्य स्वागत करण्यांत आलें.
मोहंमद अलींचे विमान पालम विमानतळावर पोहचण्यापूर्वीच त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारों लोक दिल्ली विमानतळावर जमले होते. पंडित जवाहरलाल नेहरू तर एक तास अगोदर विमानतळावर येऊन बसले होते. त्यांच्या बरोबर इतर मंत्री, परदेशी वकिलातीचे लोक, लोकसभेचे सभासद व बडे अधिकारी इत्यादि मंडळी आली होती.
मोहंमद अली विमानातून खाली उतरतांच पंतप्रधान पं. नेहरूंनी हार घालून त्यांचें स्वागत केले. मोहंमद अलींच्या बरोबर त्यांच्या पत्नीहीं आल्या असून आपल्या पतीच्या मागोमाग त्या विमानातून खाली उतरतांच श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांच्या गळ्यांत हार घालून स्वागत केले. आज त्यांच्यावर लोकांनी अक्षरशः हारांचा व फुलांचा वर्षाव केला.
मुसादिक सरकार उलथण्याचा कट फसला
तेहरान ता. 16 : मुसादिक सरकार उलथून पाडण्याचा कट काल रात्री हाणून पाडण्यांत आल्याचे वृत्त आहे. दरबारी लष्करी सैन्यानें सरकार उलथण्याचा कट केला; परराष्ट्रमंत्री हुसेन फेतमी यांना कैद केलें. पंतप्रधान मुसादिक यांच्या बंगल्यावर हल्ला केला, सरकारी फौजांनी ताबोडतोब या हल्लेखोरांचा प्रतिकार करून पहाटे पूर्वीच शांतता प्रस्थापित केली. सर्व बंडखोरांना तुरूंगांत टाकण्यांत आलें. त्यांनी पकडलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची सुटका करण्यांत आली.
काल रात्रीं इराणमध्यें झालेल्या अयशस्वी बंडांचे नेतृत्व इराणी शाहाचे पाठीराखे व लष्करी अधिकारी कर्नल रोसलोल्ला नासिरी यांनी केल्याचे कळतें. अशा प्रकारे इराणी शाहाचे लष्करी अनुयायी बंड करतील, असा बऱ्याच जणांचा वहीम होता, त्यामुळें ते अयशस्वी झाले.
इराणच्या शाहाचें गुप्त पलायन…
बगदाद, इराणचे शाह मोहंमद रझा पहेलवी आज सकाळी अकस्मात येथें एका खास विमानाने आलें. त्यांनी आपले विमान आपणच हाकलले. त्यावरून ते गुप्तपणे इराणमधून पळून आले असावेत, असें म्हणतात.