पाटण – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 92 हजार 19 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून बुधवारी धरणातील पाणीसाठा 62.92 टीएमसी झाला होता. धरणाच्या वक्री दरवाजांना पाणी टेकताच विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती; परंतु 20 जूननंतर पावसाने दीड महिना दडी मारल्याने कोयना धरण पूर्ण भरेल या, याची शंका होती. आता पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने गेल्या चार दिवसात धरणात तब्बल 12 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. याही वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास धरण व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला पावसाने हाहाकार माजवला होता. कोयना धरणात प्रतिसेकंद 1 लाख 9 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा 80 टीएमसी झाला होता.
त्यावेळी धरणातून 67 हजार 391 क्युसेक्स पाणी कोयना नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे पाटण, कराडसह सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसला होता. यावर्षी पावसाने थोडी विश्रांती दिल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणात आहे, पण पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातून विसर्ग करावा लागेल. गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला 18 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.