धरणसाखळी क्षेत्रांत पावसाचा जोर
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मागील 24 तासांत धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात सुमारे 2.50 टीएमसी वाढ झाली आहे.शहराला दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
बुधवारी सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला प्रकल्पात एकूण 13 टीएमसी म्हणजे 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील 24 तासांत खडकवासला-80, पानशेत-231, वरसगावमध्ये 220 आणि टेमघर धरण परिसरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
खडकवासला आज भरणार
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरण गुरुवारी दुपारपर्यत 100 टक्के भरण्याचा अंदाज आहे. धरण भरल्यानंतर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.