एकूण संख्या पोहोचली पावणेतेरा हजारांवर; 290 जण अत्यवस्थ
पुणे – शहरात करोनाचा उद्रेक वाढला असून, रविवारी (दि. 21) बाधितांच्या संख्येने तब्बल 620 चा आकडा गाठला. आतापर्यंतचा हा उच्चांक असून, बाधितांची एकूण संख्या 12 हजार 474 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात दि. 10 जूनपर्यंत दररोज 1 हजार 400 ते 1 हजार 900 पर्यंत नमुने घेतले जात होते. तर, रविवारी केवळ दोनशे ते सहाशेच्या आसपास नमुने येत होते. त्यावेळी शहरात दररोज 200 ते 365 पर्यंत बाधितांची संख्या सापडत होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत नमुने तपासणीची संख्या 2 हजार 400 ते 2 हजार 800 पर्यंत गेली आणि बाधितांच्या संख्येने दुसऱ्याच दिवशी 472 चा उच्चांक गाठला. शनिवारी (दि. 20) 2 हजार 684 जणांचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला.
बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच अत्यावस्थ रुग्णांची संख्याही वाढत आहे. सद्य:स्थितीत शहरात 4 हजार 529 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू आणि त्यांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये 3 हजार 81, ससून रुग्णालयात 118, तर खासगी रुग्णालयांत 1 हजार 330 बाधित उपचार घेत आहेत. त्यातील 290 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 60 जणांना व्हेंटिलेटर लावला आहे. रविवारी दिवसभरात 171 जणांना घरी सोडले असून, आतापर्यंत 7 हजार 435 व्यक्ती ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 12 हजार 474 व्यक्तींना क्वारंटाइन केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पाच दिवसांत तब्बल 2 हजार 291 बाधित
करोना तपासणीची संख्या वाढताच बाधितांच्या संख्येने शहरात पाचशेचा आकडा पार केला. आतापर्यंत पाच ते सहा दिवसांत शहरात एक हजाराच्या आसपास बाधित सापडत होते. मात्र, मागील पाच दिवसांत (दि. 17 ते 21 जून) तब्बल 2 हजार 291 म्हणजे दुप्पट बाधित सापडल्याचे दिसून येते. त्यामध्ये दि. 17 आणि 18 रोजी सर्वाधिक 460 आणि 472 बाधित सापडले. तर रविवारी तब्बल 620 बाधित सापडल्याने प्रशासन हादरून गेले आहे.