चाकण हद्दीतील कहर काही थांबेना
राजगुरूनगर – खेड तालुक्यात गेल्या 24 तासांत नव्याने 59 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आळंदी नगरपरिषद हद्दीतील एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 1729 तर मृतांची संख्या 43 वर पोहोचली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
चाकण नगरपरिषद हद्दीसह खराबवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, निघोजे, शेलपिंपळगाव आदी गावांच्या परिसरात बाधितांची रुग्णाची संख्या लक्षणीय आहे. नगरपरिषद वगळता इतर गावांमध्येही संख्या रोखण्यासाठी खेड पंचायत माध्यमातून प्रयत्न केले जात असले तरी फारसे यश मिळत नाही, स्थानिक नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह शासनाचे नियम पाळणे गरजेचे झाले आहे .
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण (15), आळंदी (0), राजगुरूनगर (3) अशा तीननगर परिषदांमिळून 18 तर निघोजे (8), शेलपिंपळगाव (4), सोळू (4), महाळुंगे (4), धानोरे (3), मरकळ (3), वडगाव घेनंद (2), मेदनकरवाडी (2), राक्षेवाडी (2), काळूस (2), रासे (1),चऱ्होली (1), कुरूळी (1), चिंबळी (1), वडगाव पाटोळे (1), खालुंब्रे (1), नाणेकरवाडी (1) या 17 गावांत 41 अशा एकूण 59 जणांना करोनाची लागन झाली आहे.
खेड तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचे वाढता संसर्ग लक्षात घेता खेड पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी उपायोजना करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. तालुक्यातील अनेक कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्स व नियमावली पाळण्यात येत नसल्याने संसर्ग बळावला असून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी सांगितले.
- तपशील…बाधित…करोनामुक्त…. एकूण मृत्यू….उपचार सुरू…24 तासांत बाधित
ग्रामीण क्षेत्र…1022…733….21…268…41
चाकण न.प…367…275…12…80…15
आळंदी न.प…..166…120…7…39…0
राजगुरूनगर न.प…174…144…3…27…3
एकूण…1729…1272…43…414…59