नंदुरबार – काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 553 क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला आहे. हा तांदूळ नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीकडून गुजरात राज्यात जात असताना कारवाई करण्यात आली. तांदूळाची वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांसह 28 लाख 42 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल तांदूळाची धुळे चौफुली परिसरातून गुजरात राज्याकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून सदरचे वाहन अडविण्यात आले. तपासणी केली असता त्यात 500 गोण्यांमध्ये 250 क्विंटल तांदूळ आढळून आला. वाहनातील दोघांकडून सादर करण्यात आलेली बिले हस्तलिखित व संशयास्पद असल्याने सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन वाहनासह जप्त करण्यात आला.
तसेच दुसरे वाहन अडवून तपासणी केली असता त्यातदेखील 506 गोण्यांमध्ये 5 लाख 28 हजार 770 रुपये किंमतीचा सुमारे 253 क्विंटल तांदूळ आढळून आला. दरम्यान, वाहनचालक सुलेमान अजमखान याने सादर केलेली ई-वे बिलात नमूद वेळ व नंदुरबारसाठी येण्याचा वेळ यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. यामुळे सदरचा तांदूळ हा अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन वाहनासह ताब्यात घेण्यात आला आहे. दोन्ही वाहनातील मिळून 10 लाख 42 हजार 135 रुपयांचा 553 क्विंटल तांदूळ व 18 लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे 28 लाख 42 हजार 135 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करत आहेत.