पुणे – देशभरातील करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवताना त्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यावर भारतीय रेल्वे जणू देवदूत ठरली आहे. देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातील शहराला प्राणवायू पुरवण्याचे कार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यातही बुधवारी मध्यरात्री
12 वाजून 55 मिनिटांनी लोणी काळभोर स्टेशन येथे ओरिसा येथून ऑक्सिजन घेऊन रेल्वे दाखल झाली. याद्वारे 55 टन ऑक्सिजन दाखल झाला आहे. त्यामुळे शेकडो करोनाबाधितांवर उपचार करण्यास मदत होणार आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची गरज दिवसेंदिवस वाढत होती. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवताना वाहतूक जलद होण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या अनुषंगाने लोणी, खडकी आणि कोल्हापूर येथे रॅम्पची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. रेल्वेद्वारे यापूर्वी नागपूर, नाशिक या ठिकाणांपर्यंत ऑक्सिजन वाहतूक केली होती. मात्र, अद्यापपर्यंत पुण्याच्या वाट्याला ऑक्सिजन एक्स्प्रेस आली नव्हती. मात्र, अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली ही बुधवारी मध्यरात्री ऑक्सिजन रेल्वे लोणी स्थानकावर दाखल झाली. ओरिसा राज्यातील अंगुल येथून आलेल्या या रेल्वेद्वारे 4 टॅंकरमधून 55 टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली.
यावेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक सहर्ष बाजपेई, प्रकाश उपाध्याय तसेच रेल्वे प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. यापुढील ऑक्सिजन वितरणासाठी जिल्हा प्रशासनाकडे टॅंकर सुपूर्त करण्यात आले, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्रात 18 टॅंकर ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली होती. यापैकी विशाखापट्टणम ते नागपूर आणि नाशिक रोड येथे सात टॅंकर, अंगुल ते नागपूर 8 टॅंकर आणि हापा ते कळंबोली 3 टॅंकर यांचा समावेश आहे.