जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड : गावनिहाय यादी जाहीर
जुन्नर- महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफीची घोषणा करून त्याची तातडीने अंमलबजावणी केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत जुन्नर तालुक्यातील 10 हजार 473 शेतकऱ्यांना 54 कोटी 93 लाख 41 हजार 394 रुपयांची गावनिहाय यादी जाहीर झाली आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक ऍड. संजय काळे यांनी दिली आहे.
दि. 30 सप्टेंबर 2019 अखेर पीक कर्जाची दोन लाखापर्यंत रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी जाहीर झाली असून नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळण्यासाठी काही प्रमाणात कर्जमाफी मिळावी, अशी मागणी ऍड. काळे यांनी केली आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेतील ऑनलाइन प्रक्रिया गुंतागुंतीची होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला होता. काही लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही लाभ मिळाला नसल्याचे काळे यांनी सांगितले. कर्जमाफी हा अंतिम पर्याय नसून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीची दुसरी यादी शनिवारी (दि. 29) जाहीर झाली असून तालुक्यातील जिल्हा बॅंकेच्या वीसही शाखांमध्ये शेतकऱ्यांनी आपले नाव आले आहे की नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. कर्जमाफी प्राप्त लाभार्थ्यांची रकमेबाबत संमती घेऊन प्रमाणीकरणाचा दाखला देण्याची प्रक्रिया (दि. 29) रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे व विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे यांनी दिली.
कर्जमाफी यादीतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम बॅंकेच्या तालुक्यातील सर्व शाखांमध्ये वेगाने सुरू असून रविवारी (दि. 1) सुट्टीच्या दिवशीही हे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती विकास अधिकारी संजीव गोसावी यांनी दिली आहे. प्रमाणिकरण झाल्यानंतर शासनाच्या पोर्टलवर ही माहिती अपलोड होते व सर्व माहिती संकलित झाल्यावर 72 तासांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली.