म्हसवड – अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या माणच्या तहसीलदार बाई माने, लिपिक तुषार पोळ व पोलिस पाटील महेश शिंदे यांच्या अंगावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिक-अप चालकाने पिक-अप अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सबंधित वाहनचालकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की म्हसवड हद्दीत अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती माणच्या तहसीलदार बाई माने यांना मिळताच त्या लिपिक तुषार पोळ व पोलिस पाटील महेश शिंदे यांच्यासोबत राजेवाडी- हिंगणी रस्त्यावर हिंगणी हद्दीत पहाटे चारच्या सुमारास त्यांनी कारवाईसाठी सापळा लावला होता. त्या दरम्यान राजेवाडीकडून वाळू घेऊन हिंगणी हद्दीत येणारे पिक-अप वाहन (एमएच 09 सीए 8777) अडविले. त्यावेळी चालकाने त्याचे नाव संकेत शेरखंडे व मालकाचे नाव दत्ता मदने असे सांगितले.
त्यावेळी पिक-अप कारवाईसाठी म्हसवड पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास चालकाला सांगितले असता चालकाने तहसीलदार बाई माने यांच्यासह लिपिक तुषार पोळ व पोलिस पाटील महेश शिंदे यांच्या अंगावर पिक-अप घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हे लोक बाजूला पळाल्याने पुढील अनर्थ टळला.
त्यानंतर चालकाने हे वाहन पंढरपूर रस्त्याने पळवून नेले असता त्याचा पाठलाग करून ते वाहन पिलिव घाटाच्या अलिकडे हिंगणी पाटी येथे पकडले असता चालक वाहन सोडून पळून गेला. हे पिक-अप वाहन एक ब्रास वाळूसह जप्त केले असून म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये लिपिक तुषार पोळ यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.