पुणे -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत 960 कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे 53 टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्याचा निर्णय मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विविध विकासकामांचा आढावा ठाकरे यांनी येथे घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते.
विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा, प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींच्या मूल्यांकनासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला.
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचा निर्णय झाला. यावेळी आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.