मॉस्को – रशियामध्ये विकसित करण्यात आलेल्या “स्पुटनिक-5′ या करोना लसीमुळे पाश्चात्य देशांमध्ये चिंता, कुतुहल आणि उत्सुकतेच्या संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. रशियातील आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांना पहिल्या टप्प्यामध्ये ही लस दिली गेली आहे. मात्र अजूनही या लसीबाबत खात्रीशीरपणे ठाम मत व्यक्त केले जात नाही.
स्पुटनिक-5 ही करोना विरोधी लस 11 ऑगस्ट रोजी यशस्वी ठरल्याचा दावा क्रेमलिनच्यावतीने केला गेला. करोनाच्या साथीला रोखण्यात ही लस 95 टक्के यशस्वी होईल, असा दावा क्रेमलिनच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी त्याबाबत विश्वासाने खात्री दिली जात नाही, याचे कारण अखेरच्या टप्प्यातील चाचण्या वगळून ही लस घाईने वापरात आणली गेली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हजारो उमेदवारांवर केल्या जात असलेल्या चाचण्या पूर्ण केल्या गेल्याच नाहीत. त्यामुळे विदेशातील अनेक तज्ञांनी या लसीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून रशियामध्ये आतापर्यंत दिड लाख आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांना ही लस दिली गेली आहे.
लसीबाबत साशंकता असल्याने लस घेतलेल्यांनी आपली काळजी घेणे सुरूच ठेवले आहे.
ब्रिटनमध्ये 2 डिसेंबरला फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या वापराला परवानगी दिली गेली. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्यात लसीकरणात मागे राहिल्याचे चित्र निर्माण होऊ नये, ही चिंता होती. रशियामध्ये आतपर्यंत 27 लाख जणांना करोना संसर्ग झाला तर 48 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी रशियात लस आणण्याची घाई केली गेली आहे.