- खासगी रुग्णालयांबाबत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला रोष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय स्थितीबाबत लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शहरातील विविध प्रश्न व भेडसावणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मांडल्या.
शुक्रवारी (दि.28) पार पडलेल्या या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीष बापट, वंदना चव्हाण जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश,पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारणी केली जाते. त्यामुळे सामान्य नागरिक, हातावरचे पोट असणारे नागरीक हवालदिल झाले आहेत. याबाबत खासगी रुग्णालयांचे ऑडिट झाले पाहिजे जेणेकरुन रुग्णालयांच्या दरांमध्ये सुसूत्रता येईल. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी महापौर माई ढोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती केली.
महापौर ढोरे म्हणाल्या की, शहरातील काही खाएसगी रुग्णांलयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना भरमसाठ बिले भरण्यासाठी त्रास देण्यात येतो. याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत असतात. याबाबत रुग्णांलयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे सांगून कोरोना तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने तसेच म्युकर मायकोसिस रोगाबाबतीत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी आरोग्य मंत्री टोपे केली.
मृत्यूंची चौकशी व्हावी
खासदार श्रीरंग बारणे यांनीदेखील खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांबाबत आक्षेप घेतला. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमधील वाढीव बिलांची तपासणी करून कारवाई करावी. कोविड काळात खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याने मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. तसेच या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित असल्याने बारणे यांनी अनधिकृत धंद्यांचा विषय उपस्थित करत हुक्का पार्लर कायमस्वरुपी बंद करण्याकरिता कारवाई करण्याची मागणी केली.