फिरोझाबाद – उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेकडील भागात डेंग्यू आणि विषाणूच्या आजारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 51 वर पोहोचली आहे. काल या आजारामुळे एका 11 वर्षे वयाच्या मुलीचाही मृत्यू झाला.
केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तर प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव आलोक कुमार शर्मा यांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला आणि ही साथ पसरलेल्या काही भागांना भेट देऊन गंभर आजारी रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली.
आतापर्यंत 179 रुग्ण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. शनिवारपासून डेंग्यूच्या रुग्णांवरील उपचारासाठी नवीन वॉर्ड सक्रिय करण्यात आला आहे. तर बरे झालेल्या 54 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 433 रुग्ण मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहा सदस्यांच्या पथकाला येथे पाठवले गेले होते, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन आणि अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत.
बांगड्या आणि काचेच्या वस्तूंच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले फिरोझाबाद हे आग्र्यापासून 50 किलोमीटरवर आणि राजधानी लखनौपासून 320 किलोमीटरवर आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून या शहरामध्ये डेंग्यूची साथ पसरली आहे. मथुरा, आग्रा आणि मैनपुरा याठिकाणीही अशासारख्या आजाराची काही प्रकरणे आढळली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंग्यूची साथ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने डासांच्या उत्पत्तीला रोखण्याची मोहीम सुरू केली आहे. साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासन आणि आरोगिय विभागाला दिल्या आहेत.