पुणे – मासळी चिकन आणि मटणाला मागणी वाढली आहे. मासळीची मागणी तब्बल 50 टक्क्यांनी वाढली आहे. तरीही सुरमई वगळता सर्व प्रकारच्या मासळीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. सुरमईच्या भावात मात्र 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली.
चिकनच्या भावात 50 रुपयांनी, तर अंड्याच्या शेकड्याच्या भावात 50 ते 60 रुपयांनी वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 10 ते 12 टन, खाडीची सुमारे 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 700 ते 800 आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 12 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.