मुंबई – ‘फास्टॅग’ प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ११ जानेवारी २०२१ पासून दिली५ टक्के सवलत (कॅशबॅक) जाणार आहे.
पथकर नाक्यावरुन जाणा-या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे. ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणा-याप्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,’असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले आहे.
फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.