सोनई – शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर यांची, तर उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची आज निवड करण्यात आली. माजी सरचिटणीस दीपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावाची सुचना आप्पासाहेब शेटे यांनी मांडली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले.
गेल्या महिन्यात 23 डिसेंबर रोजी नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 11 नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली होती. देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी 84 अर्जदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
नूतन विश्वस्तांच्या आज झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्या निवडी पुढीलप्रमाणे- दीपक दादासाहेब दरंदले (कोषाध्यक्ष), बाळासाहेब बोरुडे (सरचिटणीस), आप्पासाहेब शेटे (चिटणीस) यांच्या निवडी करण्यात आल्या.
नूतन पदाधिकार्यांचे राज्याचे जलसंधारणमंत्री तथा शिवसेना उपनेते शंकरराव गडाख यांनी नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. विश्वस्तांच्या निवडीनंतर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.