काबूल – काबूलमधून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकाच्या 5 पत्रकारांना तालिबानने अटक केली आहे. इत्तिलाद्रझ असे या वर्तमानपत्राचे नाव असून या दैनिकाचे मुख्य संपादक झकी दरयाबी यांनी ही माहिती दिली आहे. काल पाकिस्तानविरोधी निदर्शने सुरू असताना तालिबानने हवेत गोळीबार केला होता. त्या कारवाईचे चित्रण करत असलेल्या आणखी एका पत्रकारालाही तालिबानने ताब्यात घेतले आहे. वहिद अहमदी या पत्रकाराचा कॅमेरादेखील काढून घेण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी तालिबानला “दहशतवादी’ म्हणून संबोधू नये असा इशारा तालिबानशी संबंधित असलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने पाकिस्तानमध्ये दिला होता. तसे झाल्यास या पत्रकारांना शत्रू समजले जाईल असे “टीटीपी’ने म्हटले होते. “टीटीपी’ला कट्टरवादी अथवा दहशतवादी संबोधणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांवर लक्ष ठेवले जात असल्याचे “टीटीपी ‘च्या प्रवक्त्याने म्हटले होते.
“टीटीपी’ची स्थापना 2007 मध्ये झाली असून या संघटनेला दहशतवादी असल्याने बंदी घालण्यात आली आहे. “टीटीपी’चा पहिला प्रमुख बैतुल्ला महसूद हा 2009 मध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. सशस्त्र हल्ल्यांनंतर पाकिस्तान सरकारने 2014 मध्ये या संघटनेवर बंदी घातली. दहशतवादी संघटनांबाबतच्या वार्तंकनाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. तर अनेकांचा अपहरणही झाले आहे.