मुंबई-बंगळुरु महामार्गावर पाठोपाठ झालेल्या 5 अपघातात दोघांचा मृत्यू; ‘बीट मार्शल’ने वाचवले बाळाचे प्राण

पुणे – मुंबई-बेंगळुरु महामार्गावर पहाटे एका पाठोपाठ एक असे पाच अपघात झाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा ते सात जण जखमी झाले. सुदैवाने अपघातात दोन महिण्याचे बालक वाचले. कात्रजवरुन आलेला एक ट्रक भूमकर पुलावरुन खाली कोसळला. या अपघातामुळे संपुर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तर पुढे वाहतूक कोंडी झाली असताना दोन ट्रक भरधाव वेगात वाहतुक कोंडीत वाहनांना धडकले.

सोमवारी पहाटे महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरील ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. हे दोन ट्रक एकमेकांना समोरासमोर धडकून पलटले होते. या अपघातामुळे महमार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

असे असतानाच कात्रजवरुन भरधाव वेगात आलेला ट्रक भूमकर पुलावरुन खाली कोसळला. तो खाली सर्व्हिस रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्याच दरम्यान दोन ट्रकमधून एक रिक्षा जात होती. मागील ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ती पुढील ट्रकवर धडकली.

रिक्षा दोन्ही ट्रकमध्ये सापडल्याने रिक्षा चालक, प्रवाशी महिला व तीचे दोन महिण्याचे बाळ आत अडकले होते. सिंहगड पोलिसांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. दरम्यान अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असताना, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पुढील वाहनांना धडक देण्याच्या आणखी दोन घटना येथे घडल्या. यामध्ये पोलिसांची व्हॅन व एका कारचे नुकसान झाले.

वाहतूक शाखेचे कर्मचारी व सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बीट मार्शलने वाचवले बालकाचे प्राण-
अपघाताची माहिती मिळताच नऱ्हे चौकीचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले होते. ते वाहतूक सुरळीत करत असतानाच एक रिक्षा तेथे उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात येऊन धडकली. तेथे उपस्थित बीट मार्शल गणेश झगडे व इतरांनी रिक्षाकडे धाव घेतली. रिक्षाचा पुर्ण चेंदामेंदा झाला होता. रिक्षामध्ये रिक्षाचालक तर मागे एक महिला दिसली. तीला काढत असताना तीच्या हातात कापडात गुंडाळलेले एक बालक दिसली. यामुळे काळजीपुर्वक प्रथम बालक व नंतर त्याच्या आईची सुटका करण्यात आली. यानंतर या सर्वांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.