ह.भ.प. गणेश म. फड
जे ज्ञानाचा कुरूठा। तेथ सेवा हा दारवंठा। तो स्वाधीन करी सुभटा। वोळगोनी।। 4/165
श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात ओवी क्र. 165 ते 171 यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज श्रीसद्गुरू कृपा कशी होईल, यास संतांची सर्वस्वाने सेवा करावी हा एकच उपाय आहे, असे सांगतात.
संत म्हणजे ज्ञानाचे मंदिर होय. त्यांची सेवा म्हणजे त्या मंदिराचा उंबरठा. त्यांचा आश्रय घेऊन मंदिरात प्रवेश मिळवावा. कायेने, वाचेने व मनाने त्यांच्या चरणी लागावे. अहंकार टाकून त्यांचे सर्व प्रकारे दास्य करावे. म्हणजे आमच्या मनात काय इच्छा आहे, हे ते सांगतील.
त्यांनी बोध केला म्हणजे आमच्या मनातील सर्व संकल्प नाहीसे होतील. त्यांच्या शब्दांच्या प्रकाशाने आमचे चित्त बलवान होईल. आमचे संशय नाहीसे होतील तेव्हा सर्व प्राणिमात्र आपल्यासह परमेश्वरात एकरूप होऊन राहिलेले आम्हास दिसून येतील. मोहांकार नाहीसा होईल. ज्ञानप्रकाश उजाडेल व श्रीगुरू कृपा करतील.