अफगाणिस्तानात प्रथमच राज्यघटना
काबूल, दि. 15 – अफगाणिस्तानच्या कायदे मंडळाने आज देशाच्या पहिल्याच राज्यघटनेस मंजुरी दिली. तीत राष्ट्राध्यक्षांच्या हातात मोठ्या प्रमाणात व कायदे मंडळाच्या दोन सभागृहांच्या हाती मर्यादित प्रमाणात सत्ता सोपविण्याची तरतूद आहे. कायदेमंडळाच्या निवडणुका 1979 साली होणार आहेत.
युगांडाचे सरकार उलथविण्याचा प्रयत्न फसला
नैरोबी – युगांडाचे सरकार उलथून टाकण्याचा आणि नेत्यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, परंतु तो हाणून पाडला.
स्वातंत्र्य व लोकशाहीचे पुनर्मूल्यमापन व्हावे
कोल्हापूर – स्वातंत्र्य म्हणत असताच त्या स्वातंत्र्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या सहकार्याशिवाय स्वातंत्र्य अस्तित्वात येऊ शकत नाही. स्वातंत्र्याचा व्यावहारिक अर्थ लक्षात घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचार करून आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करावा लागतो तेव्हा कुठे ते प्रत्यक्षात उपभोगता येते. लोकशाहीची कल्पनाही व्यवहाराच्या कसोटीवर पुन्हा तपासून पाहिली पाहिजे, असे विचार प्राचार्य के. भोगीशयन यांनी व्यक्त केले.